विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली
गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले, एवढे
सारे अनर्थ एका अविद्येने केले...
एखाद्या महापुरूषाचा पराभव करायचा झाला की त्याच्या चरित्रातून एखादा विचार तोडून घ्यायचा आणि त्याचे सुभाषित बनवून त्याच्या कपाळावर ठोकून द्यायचे. नंतर ते सुभाषित इतक्या सवंगपणे वापरायचे की, ते अर्थहीन झालेच पाहिजे. महात्मा जोतीराव फुल्यांनी आपले शिक्षणविषयक संपूर्ण तत्त्वज्ञान अवघ्या चार ओळीत मांडले, ज्याचे विश्लेषण करायला विचारवंतांना शेकडो पाने अपुरी पडतील.
शिक्षण हा जीवनाचा आधार आहे. शिक्षणापासून आपण आपणास वेगळे करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण देणारा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. केवळ त्याच्याकडून आपण काय घ्यावे हे आपणास कळायला पाहिजे. शिक्षण ही जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. जीवन म्हणजे काय? जीवन का जगावे, जीवन कसे जगावे, जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे, जीवन पूर्ण कसे करावे. आपण जीवनातून काय घ्यावे व इतरांना काय दयावे. या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच 'शिक्षणानेच सर्व काही होत आहे, त्याकरिता आधी शिक्षण घेतलेच पाहिजे' जीवन शिक्षण ही काळाची गरज बनली आहे आणि आपल्या सर्व थोर शिक्षणतज्ज्ञांनी, विचारवंतांनी, समाजसुधारकांनी जीवन शिक्षणाची धुरा सांभाळली आहे आणि सर्वांना जगण्याची एक दशा आणि दिशा देण्याची महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण व अभ्यासक्रमातून प्रकट होणारे विचार - स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या त्रयीवर नितांत भरवसा ठेवणारे आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठविणारे म. फुले हे महापुरुष होते. त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून ओळखले जाते. ते मानवतावादी विचाराचे होते. त्यांनी मेकॉलेच्या खलित्यास कडाडून विरोध 'शिक्षण हे वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत पाझरत आले पाहिजे' या विचारास फुलेंचा विरोध होता कारण इंग्रजाचा भर प्रथम वरचा वर्ग शिकला पाहिजे व नंतर खालचा वर्ग शिकावा यावर होता. 'प्रथम खालच्या वर्गातील लोकांना शिक्षण देऊन नंतर वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण दयावे 'आधी कळस मग पाया असे न होता, आधी पाया मग कळस’ अशा पद्धतीने शिक्षणप्रणाली असण्यावर म. फुलेंचा आग्रह होता. प्रथम उपेक्षितांना शिक्षण नंतर अपेक्षितांना शिक्षण’ हे सूत्र अंमलात आणावे, यावर भर देण्यात आला.
पूर्वीच्या काळामध्ये या परिस्थितीत स्त्रियांनी शिक्षण घेणे. म्हणजे अधर्मच करणे होय. त्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे कायमची उघडली जावी, म्हणून म. फुलेंनी स्त्री-शिक्षण मोहीम सर्वप्रथम हाती घेतली. शिक्षण हे समर्थ स्त्री म्हणून जगण्यासाठी दिले जावे. स्त्रियांचा खरा धर्म त्यांना शिक्षण देणे होय. स्त्रियांच्या मानसिकतेसाठी व सक्षम स्त्री घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून म. फुलेंनी आपल्या पत्नीस शिक्षण देऊन आदय शिक्षिका म्हणून कार्यास सुरुवात केली आणि स्त्री-शिक्षण मोहमेस सुरुवात केली.
प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क आहे आणि त्यामुळे हे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. तसेच म. फुले प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत असावे या विचारांचा पुरस्कार करणारे प्रथम भारतीय नागरिक होते. ही मागणी त्यांनी १९ ऑक्टोबर १८८२ मध्ये हंटर शिक्षण आयोगापुढे एका शिक्षणावर अधिक भर देईल तर नीतीच्या आणि सद्वर्तनाच्या दृष्टीने कितीतरी चांगले लोक शिकून तयार होताना मुळीच अडचण पडणार नाही. या विचारातून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यावर भर दिला. प्राथमिक शिक्षकांची तरतूद करणे - प्राथमिक शिक्षणास मोफत व सक्तीचे केल्यास विदयार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता होती आणि त्याकरिता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक असणे देखील आवश्यक आहे आणि त्याकरिता प्रथम आवाज उठविणारे म. फुले हे एकमेव व्यक्ती होते. प्राथमिक शिक्षण हा जीवनाचा पाया आहे. त्यामुळे या स्तरावरील शिक्षण उत्तम दर्जाचे असावे. यावर अधिक भर देण्यात आला.
सरकारी नोक-यांमध्ये सर्व वरिष्ठ वर्गाची मक्तेदारी आहे, असे दिसून आल्यावर शिक्षण खालच्या वर्गातील तळागाळातील लोकांना मिळावे. यासाठी म.फुले यांनी प्राथमिक शिक्षण खालच्या वर्गास देण्यावर अधिक भर दिला. उच्च शिक्षणाकडे कमी व ग्रामीण जनतेच्या प्राथमिक शिक्षणाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षणातून उद्याची भावी पिढी घडत असते आणि आज जे प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यात आले आहे. त्यामागे म. फुलेंचे विचार, असलेले दिसून येतात. आपल्या देशामध्ये आजची परिस्थिती लक्षात घेता कमी शिकलेले अध्यापक व अनुभव कमी असलेले शिक्षक प्राथमिक स्तरावर अध्यापन करताना दिसतात आणि अधिक अनुभवी व विषयतज्ज्ञ अध्यापक वर्ग वरच्या वर्गास अर्थात उच्च स्तर अध्यापन करतात. तेव्हा वेळोवेळी प्राथमिक शिक्षण अधिक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण देणे ही काळाजी गरज बनली आहे आणि त्या दृष्टीकोनातून विचार म. फुलेंनी व्यक्त केले.
बहुजन समाज ग्रामीण भागामध्ये राहत असल्याने, त्यांच्या शिक्षणाची म. फुले यांना अधिक काळजी वाटत असे. २ मार्च १८८८ मध्ये म. फुले म्हणाले होते की आपली बहुतांश जनता खेड्यात निवास करते. तेव्हा शासनाने ग्रामीण लोकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवावे. राष्ट्रनिर्माणासाठी शुद्रांना शिक्षण - आपल्या देशात बहुजन समाज अजाण व अडाणी आहे. त्यांच्या उद्धारासाठी. शिक्षण हा एकमेव उपाय आहे. शुद्रांना शिक्षण देऊन सुशिक्षित केल्याशिवाय राष्ट्र बनू शकत नाही. ज्या देशात सामाजिक आणि आर्थिक गुलामी असते तेथे राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही. शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. यावर अधिक भर होता.
म. फुले यांच्या मते आजची शिक्षण पद्धती ही बहुजन समाजाला शिक्षणपासून वंचित करणारी होती. तेव्हा शिक्षणप्रणाली बदलली पाहिजे यावर अधिक भर दिला गेला. केवळ कारकून वर्ग तयार करणा-या वर्गाची निर्मिती शिक्षणातून होऊ नये, तर मानवी जीवन जगण्यास सक्षम बनवणारे, उदद्योगी, जीवनोपयोगी शिक्षण देण्यात यावे.
त्रिभाषा सूत्राचा अवलंब - (१९६४-६६) च्या कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्रास जरी आजच्या कालावधीत मान्यता दिलेली असली तरी या अगोदर ७७ वर्षांपूर्वी म. फुले यांनी त्रिभाषा सूत्राचा अवलंब शिक्षणात करावा यावर भर दिला होता.
जनसामान्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा ह्यासाठी खेड्यापाड्यातील जनतेला शिक्षण घेता यावे म्हणून वसतिगृहाची व्यवस्था करण्याची कल्पना म. फुले यांनी मांडली आणि गरीब, होतकरू मुलांसाठी शिष्यवृत्ती व वसतिगृहाची सुविधा देण्यावर भर दिला.
शिक्षण हा तिसरा डोळाच मानले जाते आणि त्यामुळेच म. फुले यांनी शिक्षणावर अधिक प्रकाश टाकला आहे आणि शिक्षण कोणत्याही एका व्यक्तीची मक्तेदारी न बनता, सर्वांना शिक्षण मिळावे, शिक्षणाचा प्रसार होऊन, ज्ञान व विचारांची वृद्धी व्हावी यासाठी म. फुलेंनी योगदान दिले. म. फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून स्त्रियांसाठी तसेच मागासलेल्या अनाथाच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच बालगृहाची स्थापना देखील केली. अशाप्रकारे म. फुले यांनी समाज परिवर्तनाचे कार्य करताना स्वत:च्या घरदाराचाही विचार न करता काम केले आणि म्हणून आज आपला समाज मानाने सर्व प्रकारचे शिक्षण घेत आहे. अशा शिक्षणतज्ज्ञाला, शिक्षणमहर्षीच्या कार्याला कोटी-कोटी वंदन.
महात्मा जोतिबा फुलेंचे साहित्य :
महात्मा फुले यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. आपला ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
महात्मा जोतिबा फुले साहित्य :
1. |
JYOTIBA PHULE (1827-1890) |
https://egyankosh.ac.in/bitstream/123456789/20647/1/Unit-12.pdf |
2. |
Slavery |
|
3. |
|
https://drambedkarbooks.files.wordpress.com/2017/04/bio-of-phule.pdf |
4. |
E Books on Mahatma Jyotiba Phule |
https://www.pdfdrive.com/slavery-collected-works-of-mahatma-jotiba-phule-e158508022.html |
5. |
Gulamgiri book by Mahatma Jotiba Phule in Hindi |
https://drambedkarbooks.files.wordpress.com/2015/04/gulamgiri-in-hindi.pdf |
6. |
महात्मा फुले समग्र वाड्मय ग्रंथ |
https://drive.google.com/file/d/1xOhDd_lq-DR21wJFrIDjChGFnb9iXxfh/view |
7. |
शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ |
https://drive.google.com/file/d/166d02bOBdEH6LNONFH0bEkvrB8rqvDkI/view |
8. |
सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ |
https://drive.google.com/file/d/1khkE0C2GH1Tdp0t5I3mUtTHRrjjMpOra/view |
9. |
गुलामगिरी |
|
10. |
महात्मा ज्योतिबा फुले यांचा अल्प परिचय – लेखक प.सि. पाटील |
https://drive.google.com/file/d/1JcM_PvWf7czGyFj57r1MgMcZphQ44YfH/view |
No comments:
Post a Comment