Welcome to the Jeevandeep Library Knowledge Hub. Be sure to let us know in the contact box in you have any suggestions.

Saturday, April 23, 2022

२३ एप्रिल 'जागतिक पुस्तक दिन’ निमित्ताने...

 

संपूर्ण जगभरात २३ एप्रिल रोजी 'जागतिक पुस्तक दिन' साजरा केला जातो. नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचं खास उद्दिष्ट्य आहे. खरंतर अनेकांना आजच्या दिवशी 'वर्ल्ड बूक डे' का साजरा केला जातो किंवा या दिवसाचं महत्त्व काय हे माहित नाही. त्यामुळे या दिवसामागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेऊयात. २३ एप्रिल याच तारखेची निवड का? विल्यम शेक्सपिअर, इंका गार्सिलोसा यासारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्तींचं निधन २३ एप्रिल याच दिवशी झालं. शेक्सपिअर यांचा जन्म व योगायोगाने मृत्यूदिनही तीच तारीख. जन्मगाव व मृत्यूगावही एकच. जन्म मृत्यूची तारीख व जन्म मृत्यूचं गाव एकच असा योग शेक्सपिअरच्या बाबतीत घडून आला. शेक्सपिअरच्या शरीरधर्माला भूतलावर अवघं पन्नाशीचं आयुष्यमान लाभलं पण लेखनानं निर्माण केलेलं कीर्तीमान अमर ठरलं आहे. लेखन क्षेत्रात सर्वोच्च कीर्ती (प्रसिद्धी) व सर्वोच्च श्रीमंती (आर्थिक सुबत्ता) लाभलेला बहुधा हा एकमेव माणूस. ३८ नाटकं व १५४ कविता ही त्यांची लेखन संपदा. ३८ नाटकांपैकी १० नाटके ऐतिहासिक, १६ नाटके सुखात्मक व १२ नाटकं शोकात्मक. शेक्सपिअरच्या साहित्य संपदेचं वैशिष्ठ्य म्हणजे जगात ज्ञात असलेल्या सर्वच भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत. त्यामुळे या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची घोषणा केली. 

 

हा दिवस प्रथम २३ एप्रिल १९२३ मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. त्यानंतर १९९५ मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला. हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो. काहीजण पुस्तके विनामूल्य वितरित करतात, तर कुठे स्पर्धा आयोजित केली जाते. स्पेनमध्ये दोन दिवस रीडिंग मॅरेथॉनचं आयोजन केलं जाते. या मॅरेथॉनअखेरीस एका लेखकाला प्रतिष्ठित मिगेल डे सर्व्हांटिस पुरस्कार दिला जाते. स्वीडनमधील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन स्पर्धा घेतल्या जातात.युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. UNESCO तर्फे नामांकन करून, ठराव मांडून एक शहर एका वर्षासाठी 'जागतिक पुस्तक राजधानी' 'World Book Capital' म्हणून निवडण्यात येते, त्यानिमित्ताने वर्षभर तेथे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. २०१६ साठी व्रोक्लॉ (पोलंड) या शहराची 'जागतिक पुस्तक राजधानी' म्हणून निवड झाली आहे. आपले दिल्ली शहर २००३ साली 'जागतिक पुस्तक राजधानी' होते. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 

वाचनाशी माणसाची मैत्री असावी. मोठ्या रस्त्याने दुतर्फा लावलेली झाडे पांथस्थास जशी सावली देतात व सुखाच्या प्रवासात सोबतीने भागीदारी करतात तसं मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही जीवनप्रवास समृद्ध करतात. सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानांतूनच जातो. आपल्या मराठी भाषेतही विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहे. वि.स.खांडेकर, वि.वा.शिरवाडकरांपासून आजपर्यंतच्या भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंतरवींद्रनाथ टागोरांपासून गुलजारसाहेबांपर्यंत. कन्नड भाषेतही दिग्गज लेखक आहेत. शिवराम कारंथांसारख्या लेखकाची पुस्तके अनेक भाषांत भाषांतरीत झाली आहेत. लिहिणार्‍याने लिहीत जावेवाचणार्‍याने वाचत जावे, कधीतरी वाचणार्‍याने लिहिणार्‍याचे शब्द घ्यावे, इतकं सुंदर आहे हे वाचणं. वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात. माझ्याकडे इतकी संपत्ती, इतका जमीनजुमला आहे. असले फुकाचे अहंकार वाचनाने पार नष्ट होऊन जातात. विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. वाचनाने विचार आणि वाचा यात प्रगल्भता येते. म्हणून वाचाल तर वाचाल आणि समृद्धपणे जगाल.

 

एखाद्या गोष्टीची सवय किंवा शिस्त लावायची असेल तर ती आपण टाकून ठोकून लावू शकतो. सकाळी एक तास व्यायामाची सवय व्यायाम करायला लावून लागू शकते. पण व्यायामाची गोडी त्याने निर्माण होणार नाही. वाचनाच्याही गोडीचं तसंच आहे. मुलांना आता वाचत बसा बरं का रे! उगीच हुदंडू नका!असं म्हणून खोलीत कोंडून घातलं तर मुल वाचतील, कारण दुसरा पर्याय नाही आणि पुस्तक हातात आहेत पण वाचनाचा आनंद अशा सक्तीच्या वाचनाने कसा मिळेल? वाचन ही फक्त क्रिया घडेल. त्या कृतीचा आनंद मिळणार नाही. वाचनाची गोडी लागून आनंद निर्माण व्हायला तसं वातावरण असणं ही मुलगामी गरज आहे. त्यादृष्टीने पालक, शिक्षक, ग्रंथपाल सर्वांनाच महत्वाची भूमिका बजावता येईल.

 

पुस्तक दिन आणि पुस्तकांबद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी

  • तुम्हांला ठाऊक आहे जगभरात 130 मिलियन पुस्तकं आहेत?
  • $30.8 million ला जगातील सर्वात महागडं पुस्तक विकलं गेलं आहे. हे पुस्तक लिओनार्डो द विंची यांचं 'Codex Leicester 'असून बिल गेट्स या प्रसिद्ध उद्योगपतींनी त्याची खरेदी केली. अशी Business Insider ची माहिती आहे.
  • अनेकांना नव्या कोर्‍या पुस्तकांचा वास खूप आवडतो. पण जुन्या पुस्तकांच्या वास घेण्याच्या या गोष्टीला 'bibliosmia' म्हणतात.
  • सर्वात लांब छापलं गेलेलं वाक्य हे 823 शब्दांचं आहे.
  • The Adventures of Tom Sawyer हे पहिलं असं पुस्तक आहे जे टाईपरायटर वापरून लिहण्यात आले.
  • हॅरी पॉटर, पवित्र ग्रंथ बायबल आणि Quotations from Chairman Mao Tse-Tung ही तीन पुस्तकं जगात सर्वात जास्त वाचली गेलेल्या पुस्तकांपैकी आहे.
  • जगात आईसलंड मधील लोकं सर्वाधिक पुस्तकं वाचतात.

 

हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे

  • लेखक, प्रकाशक आणि प्रताधिकार यांचे महत्व अधोरेखित करणे.
  • लहान मोठे सर्वांमध्येच वाचनाची आवड निर्माण करणे.
  • ज्या लोकांनी लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे.
  • त्यांच्याप्रति आपला आदर व्यक्त करणे.

 

वाचन म्हणजे एका अर्थाने परकाया प्रवेश असतो, जिथे लिहिणाऱ्याच्या नजरेतून आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो, तिथले अनेकविध अनुभव घेतो, त्यातील प्रत्येक क्षण प्रत्यक्ष जगतो. पुस्तकांशी मैत्री केली तर आयुष्यभराची साथ देणारे अनेक जिवाभावाचे सोबती आपल्याला मिळू शकतात, त्यांचं आणि आपलं एक वेगळं विश्व तयार होतं. वाचनाने ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, बौध्दिक आणि मानसिक विकास अशा अनेक गोष्टी साध्य होतात. एकदा वाचनाची गोडी लागली की ही वाचन भूक उत्तरोत्तर वाढत जाते आणि वाचनाचं व्यसन लागत जातं, अर्थात हे व्यसन असणं चांगलंच.अनेक भाषांतील, अनेक प्रकारचे साहित्य आपण वाचतो तेव्हा आपले विश्वही अनुभवसंपन्न होत जाते, आपले जग ठराविक गोष्टींपुरते मर्यादित न राहता विस्तारत जाते, जाणिवा समृद्ध होणे, कक्षा रुंदावणे म्हणजे काय हे वाचनातून आणि अभ्यासातून कळत जाते. वाचनाची ही ज्योत अखंड तेवत ठेवणे आपल्या हातात आहे, पुढील पिढीला वाचनाची सवय आणि आवड जपायला शिकवून आपण हे नक्कीच साध्य करू शकतो. जेवढ्या शक्य तेवढ्या लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन त्यांचेही जगणे समृद्ध करण्यास हातभार लावू शकतो. वाचनाचे महत्व जेव्हा लोकांना पूर्णतः कळेल आणि नियमित वाचनाचे व्रत सगळे अंगीकारतील तेव्हा आपला समाज नुसताच साक्षर नाही, तर खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सुधारित होण्याकडे वाटचाल करू लागेल हे निश्चित.

पुस्तकदिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.

वाचत रहा, जगत रहा, शिकत रहा...

 

विल्यम शेक्सपिअरच्या ग्रंथ संपदा पहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

1

The Romeo and Juliet

Click here

2

Hamlet 

 

Click here

3

Macbeth

Click here

4

The Tempest

Click here

5

Othello

Click here

6

King Lear

Click here

7

Julius Caesar

Click here

8

A Midsummer Night's Dream

Click here

9

The Merchant of Venice

Click here

10

welfth Night; Or, What You Will

Click here

 

No comments:

Post a Comment

डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व राष्टीय ग्रंथपाल दिन

ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचं संग्रहालय न होता ती एक संस्था व्हावी चळवळ व्हावी म्हणून अहोरात्र झिजणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा आज स्मृतिदि...